ग्रामीण भागात बियाणे साठवणुकीचे प्रकार
१. पक्की सिमेंट व पत्र्याची बांधलेली कोठी:
अशा प्रकारच्या कोठयामध्ये किडींचा प्रदुर्भाव कमी प्रमाणत होते. त्यामुळे खर्चात बचत होते. बियाणे व बाहेरील हवामान यांचा संपर्क कमी येतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते.
२. कच्ची मातीने तयार केलेली कोठी किंवा मातीची वाड्गी:
महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागामध्ये मुख्यता अशा प्रकारचे कोठी बियाणे साठवणुकीसाठी वापरली जातात. या प्रकारात पावसाळ्यात मातीची वाड्गी ओलावा धरून ठेवतात त्या मुळे किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
३. बांबूची कणगी:
अशा प्रकारामध्ये बांबूपासून तयार केलेल्या कोठ्या वापरतात. जास्त करून आदिवासी भागामध्ये दिसून येतात. पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
४. तागाची पोती वापरणे:
तागाची पोती किंवा गोणी बियाणे साठवण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र वापरली जातात. ह्या प्रकारामध्ये किडींचा प्रादुर्भाव पावसाळ्यात दिसून येतो.
५. प्लास्टिक पासून तयार केलेल्या पिशव्या:
हि पद्धत राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक, ओरिसा यांनी शोधून काढली आहे या प्रकारात ५० किलो पर्यंत बियाणे साठवता येते. ह्या प्रकारात किडींचा प्रादुर्भाव होत नाही.
६. प्लास्टिक धाग्यापासून तयार केलेली पोती:
सध्या अशा प्रकारच्या पिशव्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात परंतु या मध्ये बियाणे जास्त काळासाठी साठवून ठेवता येत नाही किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
बियाणाचे १० % नुकसान कशामुळे होते
१) बियाण्यातील ओलावा व कुबट वास – २ ते ३ %
२) बियाण्यातील विविध किंडी – २.५ %
३) उंदीर – २.५ %
४) बुरशीजन्य रोग – २ ते ३ %
बियाण्यातील ओलावा व कुबट वास:
पावसाळ्यात बियाणाला पाणी लागल्याने ओलावा निर्माण होतो अशा प्रकारच्या बियाणे सडल्यामुळे त्यास कुबट वास येतो व बियांची नासाडी होऊन नुकसान होते. किंड व बुरशीना ओलाव्यामुळे वाढीस चालना मिळते.
बियाणे साठवणुकीमध्ये सापडणारे प्रमुख किडे आणि पतंग:
सोंडे किडे:
तारुण्य आणि अळी अवस्था जास्त करून बियाने नुकसान करते. मादी जास्त करून ज्या बी मध्ये खाते तिथेच ती अंडी घालते नंतर त्या अंड्याचे पूर्ण किड्यां मध्ये रुपातर होईपर्यंत ते बिया मधेच राहतात आणि नुकसान करतात. ह्या किडीच जीवनचक्र ३५ दिवसात पूर्ण होते या साठी पोषक तापमान २८० c आणि आद्रता ७० % असल्यास किडे झपाट्याने वाढतात.
पतंग :
बियाण्या जवळ अंडी घालतात. पांढऱ्या रंगाच्या अळ्या बी ला होल पाडतात आणि आतील भाग खातात. तरुण अवस्थेत आल्यावर बी तील आतील भाग खाऊन कडेचे आवरण तसेच ठेवतात नंतर त्या आवरणाच्या आत ते कोश तयार करतात. पतंग अवस्थेत आल्यावर बाहेरील आवरण तोडून ते बाहेर येतात नंतर वरच्या भागातील बियाणे ते खातात. त्या खोलवर साठवलेल्या बियाण्यात जात नाहीत.
धान्य, बियाणे पोखरणारे किडे/ अळी :
जास्त करून अंडी बियाण्यामध्ये घालतात. अळ्या बियाण्यामध्ये शिरतात आणि तिथेच वाढतात आणि बियाची झालेली पावडर ते खातात जी पावडर तरुण किड्यांनी तयार केलीली असते. या किडीच्या प्रजनन वाढीसाठी तापमान ३४ से. ग्रे. पोषक असते. आद्रता ६० ते ७० % लागते. मादी तिच्या आयुष्य काळात ३००-५०० अंडी घालते.
पीठातील लाल किडे आणि अळी:
हे किडे व अळी प्रामुख्याने पिठावर आणि फुटलेल्या बियाण्या वरती गुजराण करतात नफुटलेल्या बियाण्यावर ते खात नाहीत. ह्या किडीमुळे साठवणुकीत दुर्गंध येतो. प्रजननासाठी आवश्यक तापमान ३५ से. ग्रे. आद्रता ७५ % लागते. मादी २० दिवसांच्या आयुष्य चक्रात ५०० अंडी घालते.
उंदरांचे नियंत्रण:
पावसाळ्यात शेतातील उंदरांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते जवळील घरे, गोडावून किंवा निवाऱ्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. उंदरांचे पर्जनन खूप जलद गतीने होते. नर मादीच्या एका जोडीपासून आयुष्यभरात ८० उंदरांची पैदास होते. जन्मानंतर १० दिवसांनी उंदराला तीक्ष्ण दात येतात. दर महिन्याला त्याची लांबी १/२ से.मी. ने वाढते. मादी दर दोन महिन्यांनी पिल्ले देते. प्रत्येक वेळी सहा ते दहा पिल्लांना जन्म देते. गर्भ धारणेचा काळ २० ते २८ दिवसांचा असतो. मादी एका वर्षात पाच ते सहा वेळा विते. हि पिल्ले दीड ते दोन महिन्यांत वयात येतात. उंदरांचे नियंत्रण करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.
१) गोदाम, घर आणि शेतात एकाच वेळी उंदीर नियंत्रण मोहीम घ्यावी.
२) दरवाजे घट्ट बसणारे असावेत जेणेकरून उंदीर आतमध्ये शिरकाव करणार नाहीत. दरवाज्याला जमिनीच्या बाजूस पत्रा बसवावा.
३) खिडक्यांना व मोऱ्यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात.
४) घरात गोदामात स्वच्छता ठेवावी.
५) शेतात खोल नांगरट करून बिळे नष्ट करावीत.
६) उंदीर पकडण्यासाठी पिंजरा, सापळा यांचा वापर करावा.
७) वीघटक सौम्य विष तसेच झिंक फोस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या २-३ दिवस उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवावे. त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर त्यात ३ ग्रॅम झिंक फोस्फाईड टाकून, हातमोजे घालून किवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावे.
बुरशीजन्य रोग:
पावसाळ्यात आद्रता वाढल्यानंतर बुरशीची वाढ जास्त प्रमाणात दिसून येते. अॅस्पर्जिलस व पेनिसिलियम या प्रकारातील बुरशी जास्त करून बियाणे साठवणीच्या ठिकाणी आढळते. फुटलेले बियाणे बुरशी ला लगेच बळी पाडतात त्या मुळे बुरशीची वाढ जास्त प्रमाणात होते. पांढऱ्या रंगाच्या जाळ्या बियाण्यामध्ये दिसून येतात. बियाणे काळपट दिसते. अशा प्रकारच्या बियाण्याची उगवण क्षमता खूप कमी होते.
बियाणे साठवणुकीमधील एकात्मिक किंड नियंत्रण:
१) बियाण्यामधील पाण्याचे प्रमाण १० ते १२ टक्के ठेवावे.
२) पावसाचे पाणी साठवणीच्या ठिकाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.
३) साठवण ठिकाणे साफ ठेवावीत.
४) पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी जेणेकरून जमिनीचा संपर्क येणार नाही.
५) बाजारामध्ये आता साठवणुकीत ठेवण्यासाठी कीड नियंत्रक सापळे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.
६) हवा बंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्या मुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
७) कडूलिंबाचा पाला साठवण पत्रामध्ये मिसळून ठेवला तरी चांगल्या प्रकारे किंड नियंत्रण होऊ शकते.
८) निमतेल, निमार्क आणि निबिसिडीन या पैकी कोणतेही एक औषध २ मी.ली १ किलो बियाण्यास चोळावे किवां पोत्यावर बाहेरून फवारावे.
९) साठवणुकीची पोती, कणग्या, पक्की कोठारं, वाहतुकीची साधने किंवा भिंतीच्या फटी मधील किडींचा नाश करण्यासाठी मेलॉथियान १ लिटर + १०० लिटर पाणी यांची फवारणी करावी. हि फवारणी उघडया बियाण्यावर करू नये. त्यानंतर बियाणे साठवणूक करावी.
१०) २५ टक्के पाण्यात मिसळणारी डेल्टामेथ्रीन पावडर ४० ग्रॅम + १ लिटर पाणी यांचे द्रावण साठवलेल्या पोत्यावर तसेच कोठारावर बाहेरून फवारणी करावी, हि फवारणी दर ३ महिन्याने करावी.
११) पावसाळ्यात गॅसयुक्त धुरीजन्य औषधाने किंडीपासून तसेच बुरशीपासून संरक्षण करता येते त्यासाठी साठवण ठिकाणे हि हवाबंद करावी लागतात. साठवलेलं बियाणे प्लास्टिक कागद किंवा ताडपत्रीने झाकून त्यात धुरीजन्य औषधाच्या पुड्या फोडून ठेवाव्यात व झाकण ८-१० दिवस बंद ठेवावे.