• पोटफुगी –
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात खाद्याचे पचन होत असताना वायूची निर्मिती होत असते आणि हा वायू तोंडावाटे (ढेकर) किंवा अन्य मार्गांनी बाहेर पडत असतो. पण काही कारणामुळे पोटातील वायू ढेकर किंवा अन्य मार्गांनेही शरीराबाहेर पडू शकत नाही त्यामुळे जनावरांना पोटफुगी होते.
काही वेळेला या वायूचे साबणाचा फेस जसा तयार होतो तशा फेसामध्ये रूपांतर होऊनही शरीराबाहेर पडणे कठीण जाते व जनावर पोटफुगीने आजारी पडते.
• लक्षणे –
जनावराच्या डाव्या भागाकडील पोट हे पूर्णपणे फुगते आणि हाताने पोट वाजविले तर येणारा आवाज हा घुमतो.
२. पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर ओरडत असते, वारंवार लघवी व शेण टाकते.
३. जनावराला श्वासोच्छवास व्यवस्थित करता येत नसल्यामुळे ते जीभ बाहेर काढून श्वासोच्छ्वास करत असते. त्यामुळे जनावर बैचेन व अस्वस्थ होते.
४. पोट जर वायूमुळे फारच फुगले तर जनावर लगेच दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
• कारणे –
१. खराब दर्जाचा चारा खाल्यामुळेही पोटफुगी होते.
२. अन्नातील कोबाल्टच्या कमतरतेमुळे, विषबाधेमुळे आणि प्लॅस्टिक खाल्ल्यामुळेही पोटफुगी होते.
३. चारा / खाद्य गिळत असताना चुकून आंब्याची कोय किंवा बटाटा अन्ननलिकेत अडकल्यामुळे पोटात वायू तयार होतो आणि हा वायू बाहेर न पडल्यामुळे पोटफुगी होऊ शकतो.
४. पावसाळी हंगामात हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे तो जनावरांना भरपूर खाण्यास मिळतो. परंतु चाऱ्याचे पूर्णपणे पचन न झाल्यामुळे पोटफुगी होते.
५. जनावर एकाच जागेवर सारखे न हालचाल करता बसलेल्या अवस्थेत असले तरी पोटफुगी होऊ शकते.
• प्रथमोपचार –
१. वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जर पोट पूर्णपणे टणक झाले असेल तर दाभणाने किंवा जाडसर इंजेक्शनच्या सुईने मणका व कटिबंधातील हाड यांच्या तयार झालेल्या त्रिकोणातील डाव्या बाजूस छिद्र पाडावे जेणेकरून पोटातील वायू बाहेर पडू शकेल.
२. जनावरांच्या तोंडात बोटे घालून पडजीभेच्या स्नायूंना उत्तेजित करावे. जेणेकरून ढेकर येऊन वायू बाहेर पडेल.
३. शक्य असल्यास जनावराच्या अन्ननलिकेत जाऊ शकेल अशी रबराची लांब नळी पोटात सोडावी व पोटातील वायू बाहेर काढावा. ही क्रिया काळजीपूर्वक करावी. जनावराला इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
४. जनावरातील फुगलेल्या पोटाच्या भागावर बाहेरून जोरजोरात तेलाने चोळून मालिश करावी व त्याला चालण्यास किंवा पळण्यास लावावे.
५. जनावरांच्या तोंडात थोड्या वेळ काठी बांधून ठेवावी. जेणेकरून पोटातील साठ्लेला वायू बाहेर पडेल.
६. घरगुती प्रथमोपचार म्हणजे अर्धा लिटर गोडेतेल व टर्पेटाईनचे तेल ३० ते ४० मी.ली. मिसळून जनावरास हळूहळू पाजावे.
• पोटफुगी होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी –
१. पावसाळी हंगामात हिरवा चारा मर्यादित किंवा गरजेपुरताच द्यावा. त्याचबरोबर जनावरास भरपूर प्रमाणात व्यायाम द्यावा.
२. चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध करून द्यावा. निकृष्ट दर्जाचा चारा देणे टाळावे. चाऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद, खिळे, तारा, आंब्याची कोय, जाड घन वस्तू जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
३. जनावरांना एका कुशीवर/अंगावर फार वेळ बसू देऊ नये.
४. पोटफुगीची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब गोडेतेल पाजावे.
५. हिरव्या चाऱ्यासोबतच जनावराला काही प्रमाणात कोरडा चाराही द्यावा.
६. फक्त ओला चारा देणे शक्यतो टाळावे. गाई-म्हशी मध्ये हिरव्या चाऱ्यामुळे पोटफुगी होण्याचे प्रमाण साधारणत: २० टक्क्यांपर्यंत आहे.