मातीचा नमुना कसा घ्यावा?
पिकाला सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिल्यानंतर तीन महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंचसखलपणा, बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे अर्धा ते दोन हेक्टरचे वेगवेगळे भाग पाडावेत. प्रत्येक भागातील नमुने घ्यावेत. मातीचा नमुना प्रतिनिधिक असावा. निवडलेल्या शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ५ ते ६ वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी, रुंदीनुसार कमी जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर खुणेसाठी फांदी अगर दगड रोवावा. त्या प्रत्येक खुणेजवळील पालापाचोळा, तण काढून टाकावे. त्या ठिकाणी इंग्रजी, ‘व्ही’ आकाराचा २० ते ४० सेंमी खोलीचा खड्डा घेऊन खड्ड्यातील माती बाहेर काढावी. त्यानंतर खड्याच्या एका बाजूची साधारण चार सेंमी जाडीची माती खुरप्याने तासून हि माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने शेतातून १० ते १२ ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा करावेत. नवीन फळबागेसाठी नमुने घेताना ० ते ३० सेंमी, ३१ ते ६० सेंमी, ६१ ते ९० सेंमी याप्रमाणे तीन ठरतील माती नमुन्यासाठी वेगळी घ्यावी. जुन्या फळबागेतील नमुना घेताना दोन झाडांच्या ओळीतील खोडापासून ३० सेंमी बाजूला व ० ते ४५ सेंमी खोलीवर घ्यावा.
एका शेतातून गोळा झलेली माती एकत्र चांगली मिसळून ताडपत्रीच्या तुकड्यावर पसरावी. मातीतील खडे व मुले काढून टाकावीत त्यानंतर या मातीच्या नमुन्याचे चार समान भाग करावेत समोरासमोर दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करावेत. पुन्हा समोरासमोरील दोन भाग वगळावेत. अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलो माती शिल्लक असेपर्यंत करावे. असा नमुना कापडी पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
मातीचा नमुना घेण्यासाठी खड्याची खोली:
हंगामी पिकासाठी: २० ते २५ सेंमी
बागायती पिके (ऊस, केळी इ.): ३० ते ४० सेंमी
फळ पिके: ६० सेंमी
खालील ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये:
पाण्याच्या पाटाजवळील जागा
दलदलीची जागा
घराजवळील जागा
जनावरे बांधण्याची जागा
खते व कचरा टाकण्याची जागा
माती नमुन्यासोबत द्यावयाची माहिती:
१. नमुना क्रमांक
२. नमुना घेतल्याची तारीख
३. शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता
४. सर्व्हे क्रमांक किंवा ठिकाण (शेताचे नाव)
५. नमुन्याचे प्रतिनिधीक क्षेत्र (एकर/हेक्टर)
६. जमिनीचा उतार (उताराची/सपाट)
७. काही विशेष लक्षणे (खरवत/चोपण/आम्ल/इतर
८. पाण्याचा निचरा (चांगला/बरा/वाईट)
९. जमिनीची खोली (सेंमी/मी)
१०. जमिनीचा प्रकार (बागायती/जिरायती)
११. मागील हंगामातील पिक व जात
१२. पुढील हंगामातील पिक व जात
पान व देठाचा नमुना कधी घ्यावा: पिकातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासण्यासाठी कमतरतेची लक्षणे दिसण्यापुर्वी किंवा फुलांच्या अवस्थेमध्ये घ्यावे. सकाळी अथवा दुपारी पानाचा नमुना घ्यावा. जेव्हा रोप चार इंचापेक्षा कमी उंचीचे असते त्यावेळी जमिनीवरील एक इंचावरील रोपाचा पूर्णभाग घ्यावा. मोठ्या झाडांचा नमुना घेताना नुकतेच पक्व झालेले पान घ्यावे.
जेव्हा कमतरतेची लक्षणे दिसतील तेव्हा चांगल्या प्रतीचे पान व कमतरतेची पाने पृथःकारणासाठी द्यावीत. तसेच मुळाच्या कार्यकक्षेतील मातीचा नमुना सुद्धा दोन्ही झाडाखाली घ्यावा. जेव्हा पूर्ण क्षेत्रातील पाने एकसारखी असतील तेव्हा एकाच ठिकाणाचा नमुना घेतला तरी चालेल. जेव्हा जमिनीमधील उंचसखलपणा, मातीची प्रत, झाडाचे वय, जात वेगळी असेल तेव्हा त्या भागतील नमुना वेगळा घ्यावा.
पाने व देठ पृथःकरणासाठी नमुना कोणता व कधी घ्यावा?
पिक-------------------नमुना--------------------------------------पिक अवस्था--------------------------------------------नमुना संख्या
कापूस----------------शेंड्याकडून चौथ्या पानाचा देठ------------फुले लागण्याची अवस्था--------------------------------५०
ऊस-------------------शेंड्याकडून तिसरे पान---------------------३,५ महिन्यानंतर----------------------------------------१५
स्ट्रॅबेरी----------------पूर्ण वाढलेले पान---------------------------मुख्य शिरविरहित फळे लागताना----------------------३०
केळी------------------शेंड्याकडून तिसऱ्या पानाचा देठ----------गर्भधारणा होताना लागवडीनंतर ४ महिन्यांनी-------१५
सीताफळ-------------शेंड्याकडून पाचवे पान---------------------नवीन फुटीनंतर २ महिन्यांनी--------------------------३०
अंजीर----------------नवीन फुटीवरील शेंड्याकडून खालच्या बाजूचे पूर्ण तयार पान----------जुलै-ऑगस्टमध्ये-------२५
मोसंबी--------------- नवीन फुटीवरील ३ ते ५ महिने वयाचे पान, शेंड्याकडून पहिले---------जून------------------------३०
पेरू--------------------नुकतेच पक्व झालेल्या शेंड्याकडून तिसऱ्या पानाची जुडी------फुले येण्याची अवस्था-----------२५
आंबा------------------देठासह पान-----------------------------------४ ते ७ महिने वयाचे फांदीवरील मधले पान----------१५
पपई------------------शेंड्यापासून सहाव्या पानाचा देठ------------लागवडीनंतर ६ महिन्यांनी----------------------------२०
डाळिंब---------- -----शेंड्याकडून आठव्या पानाची जुडी-----------कळी येताना--------------------------------------------५०
चिक्कू-----------------शेंड्याकडून दहावे पान------------------------सप्टेंबर-------------------------------------------------४०